सोशल मीडियावर आपल्या हटके शैलीने आणि वेब सिरीजमधील दमदार अभिनयातून लाखो चाहत्यांची मने जिंकणारा बारामतीचा लाडका सुपुत्र सूरज चव्हाण यंदाच्या बिग बॉस मराठीच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. 'झापुक झुपूक', 'गुलीगत', 'बुक्कीत टेंगूळ' या गाजलेल्या संवादांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा सूरज आता घराघरात ओळखला जातो. सूरज चव्हाणने आपल्या अभिनय कौशल्याने वेगळी ओळख निर्माण केली असून, मराठी मनोरंजन विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या या तरुणाने मेहनतीच्या बळावर गाठलेले हे यश खरंच प्रेरणादायी ठरले आहे.
या यशानंतर बारामतीचा सुपुत्र असलेल्या सूरज चव्हाणने आपले मतदारसंघाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीनंतर अजित पवारांनी अत्यंत माणुसकीने आणि आपुलकीने पुढाकार घेत सूरज चव्हाणच्या घरासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
अजित पवारांचा भावनिक निर्णय
सूरज चव्हाणसाठी घर बांधून देण्याचा निर्णय घेत अजित पवार यांनी केवळ शब्द नाही, तर कृतीने साथ दिली आहे. सूरजच्या गावात सुरु असलेल्या घराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी स्वतः अजित पवार गेले होते.
या पाहणीवेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेवर विशेष भर देत, कोणत्याही प्रकारची कसूर न होण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ही संपूर्ण घटना अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर सविस्तर फोटोसह पोस्ट केली असून, ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेतून अजित पवार यांची समाजप्रेमी आणि तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देणारी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. एक छोट्याशा गावातून झेप घेणाऱ्या कलाकाराला घर बांधून देण्याचा निर्णय ही केवळ मदत नाही, तर त्याच्या स्वप्नांना बळ देण्याचा मोठा धाडसी पाऊल आहे.
सूरज चव्हाण याने आपल्या मेहनतीने मनोरंजन विश्वात स्थान मिळवले. त्याचे हे यश आता हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अजित पवार यांची साथ आणि मार्गदर्शन मिळाल्याने सुरजचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार, यात शंका नाही. ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही, ही आहे एका स्वप्नाची उड्डाण घेण्याची शौर्यगाथा जिथे मेहनत, प्रेरणा आणि नेतृत्व यांचा संगम झाला आहे! स्वतःच्या कर्तुत्वावर सूरज ने आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसातच केदार शिंदे दिग्दर्शिक सूरजचा 'झापुक झुपूक' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.