राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज, १२ डिसेंबर रोजी, ८५ वा वाढदिवस आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची भेटीसाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांची ही पहिलीच भेट आहे. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित आहेत.
अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राज्यासह देशभरातून त्यांच्या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडत अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांसोबत 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली होती. यानंतर शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंबीय आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले होते. शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र विधानसभेत अजित पवारांनी बाजी मारली.
आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवरून खास शुभेच्छा दिल्या. यानंतर अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे शरद पवारांच्या भेट घेतली. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली आहे.