राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल, शुक्रवारी वैष्णवी हगवणे आई-वडील, कस्पटे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी वैष्णवीच्या बाळाचीही विचारपूस केली. वैष्णवी मृत्यू प्रकरण समोर आल्यापासूनच अजित पवारांनी या प्रकरणी कडक धोरण अवलंबल आहे. त्याच्या पक्षातील असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना पक्षातून तत्काळ हकालपट्टी केल्यापासून ते आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी यंत्रणा सज्ज करण्यापर्यंत सर्व गोष्टींवर अजित पवार यांनी स्वतः लक्ष दिले. दरम्यान, त्यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, "ही केस फास्ट ट्रॅकवर चालवली जावी, असं मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. सर्व यंत्रणा मिळून ही केस इतकी स्ट्राँग करण्याचा प्रयत्न करत आहे की, जेणे करून सर्व आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. या संदर्भात सरकार किंवा आमचं विभाग हयगय करणार नाही. या केसमध्ये आणखी एक व्यक्ती समोर आली आहे, ती म्हणजे निलेश चव्हाण. वैष्णवीच्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केल्याचं सांगितलं जातयं. त्या रेकॉर्डवर आलेल्या आहेत. त्याला पकडण्यासाठीही टीम पाठवली आहे."