NCP Ajit Pawar : राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पहिलाच डाव टाकत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 37 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाकडून एकूण 100 उमेदवार रिंगणात उतरवले जाणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 37 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या यादीत माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मलिक कुटुंबाला उमेदवारी
नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण डॉ. सईदा खान आणि सुन बुशरा मलिक हे तिघेही यंदा महापालिका निवडणूक लढवणार आहेत. प्रभागांमध्ये झालेल्या आरक्षण बदलांमुळे कप्तान मलिक यांनी स्वतःसाठी वेगळा प्रभाग निवडला असून त्यांच्या सुनेला त्यांच्या आधीच्या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारांना त्वरित तयारीचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांना उद्यापासून अधिकृत एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाने महायुतीपासून वेगळा मार्ग स्वीकारत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिल्या यादीतील उमेदवार
या पहिल्या यादीत शहरातील विविध वॉर्डमधून अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात मनिष दुबे, सिरील डिसोझा, अहमद खान, बबन मदने, सुभाष पाताडे, सचिन तांबे, आयेशा खान, सज्जू मलिक, शोभा जाधव, हरिश्चंद्र जंगम, अक्षय पवार, ज्योती सदावर्ते, रचना गवस, भाग्यश्री केदारे, सोमू पवार, कप्तान मलिक, चंदन पाटेकर, दिशा मोरे, सबिया मर्चंट, विलास घुले, अजय विचारे, हदिया कुरेशी, ममता ठाकूर, युसूफ मेमन, अमित पाटील, धनंजय पिसाळ, प्रतीक्षा घुगे, नागरत्न बनकर, चांदणी श्रीवास्तव, दिलीप पाटील, अंकिता द्रवे, लक्ष्मण गायकवाड, डॉ. सईदा खान, बुशरा मलिक, वासंथी देवेंद्र, किरण शिंदे आणि फरीन खान यांचा समावेश आहे.
इतर पक्षांचीही तयारी अंतिम टप्प्यात
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही इच्छुक नाराज झाले आहेत. त्यातील काही जण अजित पवार गटात प्रवेश करत असल्याचेही दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत.
भाजप आणि शिवसेना युतीमधील जागावाटपावरही चर्चा जवळपास पूर्ण झाली असून लवकरच त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही तासांत मुंबईतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
थोडक्यात
राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी जोरात सुरू.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली.
पहिल्या टप्प्यात एकूण 37 उमेदवारांना उमेदवारी.
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार हे स्पष्ट.
पक्षाकडून एकूण 100 उमेदवार राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी जोरात सुरू.