थोडक्यात
अजित पवारांनी राजीनामा द्यावा
‘महार वतनाची जमीन विक्रीयोग्य नाही, मग व्यवहार कसा झाला?’
‘पार्थ पवार यांना तुरुंगवास होऊ शकतो’
पुण्यातील पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. “या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी अजित पवार यांनी तात्काळ उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा तपासावर जनतेचा विश्वास राहणार नाही,” अशी मागणी त्यांनी केली.
‘कलेक्टरवरही कारवाई व्हावी’ – दमानिया यांचा संताप
पार्थ पवार प्रकरणातील चौकशीसाठी नेमलेले सहापैकी पाच अधिकारी पुण्यातीलच असल्याने “ही चौकशी निष्पक्ष कशी होईल?” असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला. “या प्रकरणाची फाईल गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे, तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही. शीतल तेजवानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं होतं, पण काहीच प्रतिसाद दिला गेला नाही, त्यामुळे राज्य सरकारने संबंधित कलेक्टरला निलंबित करावे,” अशी मागणी दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केली.
‘महार वतनाची जमीन विक्रीयोग्य नाही, मग व्यवहार कसा झाला?’
दमानिया यांनी पार्थ पवार यांच्या व्यवहारावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. “महार वतनाची जमीन कायद्यानुसार विकता येत नाही, तरीही पार्थ पवार यांनी ती जमीन विकत घेतल्याचा व्यवहार नोंदवला. या व्यवहारात मुद्रांक शुल्क विभागाने तब्बल २१ कोटी रुपयांचे शुल्क माफ केले, हे अत्यंत संशयास्पद आहे,” असा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी विचारले, “जमिनीवरील पॉवर ऑफ अॅटर्नीची नोंद नसताना व्यवहार कसा झाला? व्यवहार रद्द करण्याचा अधिकार कोणाला दिला? हे सर्व कायदेशीरदृष्ट्या अवैध आहे.”
तो व्यवहार रद्द करणारे अजित पवार कोण?’
अंजली दमानिया म्हणाल्या, “एखादा व्यवहार रद्द करण्याचा अधिकार केवळ व्यवहारातील विक्रेता आणि खरेदीदार यांनाच असतो. शीतल तेजवानी किंवा पार्थ पवार यांना तो अधिकार नाही. अशा परिस्थितीत अजित पवार स्वतः व्यवहार रद्द करतात, हे कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरता येत नाही. व्यवहार रद्द करायचा असेल, तर त्यासाठी दिवाणी न्यायालयात जावं लागतं.”
‘पार्थ पवार यांना तुरुंगवास होऊ शकतो’
दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटलं, “जर हा व्यवहार जाणूनबुजून केला गेला असेल, तर संबंधितांना ७ ते १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पार्थ पवार कंपनीतील ९९ टक्के भागीदार आहेत. त्यांनी दिग्विजय पाटील यांना संपूर्ण अधिकार दिले होते. त्यामुळे व्यवहाराबद्दल अज्ञानाचा दावा करणं शक्य नाही.”
‘संपूर्ण पवार कुटुंब रडारवर’
अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित ६९ कंपन्यांचा सखोल अभ्यास करणार असल्याची घोषणा दमानिया यांनी केली. “सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या नावाने असलेल्या सर्व कंपन्यांचा तपशील मी उघड करणार आहे,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी टोला लगावत म्हटलं, “सिंचन घोटाळा सिद्ध झाला होता, पण फडणवीस मित्र झाले आणि तुम्ही वाचलात!”
निष्पक्ष चौकशीसाठी राजीनामाच एकमेव मार्ग
दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “जेव्हा सत्तेत असलेले लोक स्वतःविरुद्धच्या प्रकरणात चौकशीवर नियंत्रण ठेवतात, तेव्हा निष्पक्षता शक्यच नाही. त्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा देऊन चौकशीला मोकळा मार्ग द्यावा.” या पत्रकार परिषदेमुळे पुण्यातील जमीन प्रकरणावर राजकीय वाद पुन्हा पेटला असून, विरोधकांनीही या मुद्द्यावर अजित पवार यांच्यावर दबाव आणण्याचे संकेत दिले आहेत.