उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील हडपसर येथे जनसंवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांचे अनेक प्रश्न जाणून घेऊन त्यावर तात्काळ निवारण काढण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान या जनसंवादमध्ये अजित पवारांनी त्यांच्याशी संबंधीत आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयांवर पडखर भाष्य केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. यावर विरोधकांकडून अजित पवारांवर टीकांचा जोर पडलेला पाहायला मिळत आहे.
अजित पवारांची प्रतिक्रिया काय?
याचपार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "मी राज्य सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून इथे बसलो आहे हे सरकारचं काम आहे, सध्या नागरिकांची प्रश्न सोडवत आहे सगळे अधिकारी इथे आहेत, आम्हाला सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे , पालकमंत्री म्हणून माझ्या वरती जबाबदारी आहे, वेगळा अर्थ काढू नका. तुम्ही मीडिया वाले माझे काम दाखवण्यापेक्षा बाकी नको त्या गोष्टी दाखवतात असं नका करू. सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी सगळ्या अधिकाऱ्यांशी कशा पद्धतीने वागतो हे त्यांना विचारा... "
त्याबद्दल नो कमेंट्स- अजित पवार
पुढे अजित पवार म्हणाले की, "त्याबद्दल नो कमेंट्स... माझी भूमिका मांडली आहे फेसबुकवर आणि ट्विटर मी स्पष्टीकरण दिलं आहे. मी त्यावर बोलणार नाही. मला जे उत्तर द्यायचं आहे ते दिल आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितला आहे अजित पवारांनी जी भूमिका मांडायची आहे ती मांडली आहे".
भारत-पाकिस्तान सामन्यावर काय म्हणाले अजित पवार?
तसेच पुढे आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना खेळण्यावरुन शिवसेना ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार. अनेकांची मत वेगळी असतात. यामध्ये दोन्ही वर्ग आहेत. दोन्ही वर्गाचं वेगवेगळे म्हणणं आहे. सामना होणार आहे अशी माझी माहिती , ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेला आहे".
शिंदे-फडणवीस नाराजी
त्याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे. ड वर्ग पालिकांवर आतापर्यंत सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे आणि नगरविकास विभागातील हस्तक्षेपामुळे शिंदे फडणवीसांवर नाराज असल्याच समोर आलं आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "अस काही नाही, मी स्टॅम्पवर लिहून देऊ की असं काही नाही. आम्ही तिघे एकत्रित बसतो त्यावेळेस कधीही अस जाणवलं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही चांगले काम करतात. राज्यात चांगला कारभार व्हावा असा आमचा तिघांचा प्रयत्न असतो. आमच्या तिघांच व्यवस्थित सुरू आहे".