ताज्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवार गटाचं एक पाऊल मागे, ‘घड्याळ’चा हट्ट सैल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा प्रयत्न

निवडणूक चिन्हावरून आघाडी तुटणार, अशी चर्चा सकाळपासून राजकीय वर्तुळात रंगली असतानाच अजित पवार गटाकडून एक महत्त्वाचा संकेत मिळाला आहे.

Published by : Varsha Bhasmare

पुणे–पिंपरी चिंचवड परिसरातील स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणूक चिन्हावरून आघाडी तुटणार, अशी चर्चा सकाळपासून राजकीय वर्तुळात रंगली असतानाच अजित पवार गटाकडून एक महत्त्वाचा संकेत मिळाला आहे. घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा हट्ट सोडत, आघाडी टिकवण्यासाठी एक पाऊल मागे येण्याची तयारी अजित पवार गटाने दर्शवली आहे.

चिन्हावरून वाद, पण आघाडी फिस्कटू नये यासाठी प्रयत्न

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्यात जमा असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. अजित पवार गटाकडून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नसल्याने चिन्हावरून आघाडी तुटण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधून मात्र वेगळाच सूर उमटला आहे. “फक्त निवडणूक चिन्हामुळे दोन्ही राष्ट्रवादींमधील आघाडी फिस्कटणार नाही,” असा स्पष्ट संदेश अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांनी दिला आहे.

‘घड्याळाचा हट्ट धरणार नाही’ योगेश बहल

अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी थेट भूमिका मांडत सांगितलं की, “शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवायची असेल, तर आम्ही घड्याळाचा हट्ट धरणार नाही. जागावाटपाच्या मुद्द्यावरून आघाडीची चर्चा तुटू नये, हाच आमचा प्रयत्न आहे.” इतकंच नाही, तर स्वतःच्या उमेदवारीबाबतही त्यांनी लवचिक भूमिका घेतली आहे. “जर शरद पवार राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत यांना माझ्या प्रभागातून उमेदवारी द्यायची असेल, तर वेळप्रसंगी मी स्वतः निवडणूक लढवणार नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात,” असं स्पष्ट करत बहल यांनी सामंजस्याचा सूर लावला.

जागावाटपावर चर्चा सुरू, 27 वरून 22 जागांवर शरद पवार गट

सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपाबाबत सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे. सुरुवातीला 27 जागांची मागणी असलेल्या शरद पवार गटाने ती संख्या कमी करत 22 जागांवर समाधान व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भात लवकरच खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा होणार आहे. योगेश बहल म्हणाले, “या चर्चेतून निश्चितच सकारात्मक तोडगा निघेल. तुषार कामठे काय म्हणतात याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही. अजित दादा जो निर्णय घेतील, तोच अंतिम असेल.”

काही जागांवर माघार शक्य नाही, अंतर्गत नाराजीही

जरी चिन्हावरचा हट्ट सैल केला असला, तरी काही जागांबाबत अजित पवार गट ठाम आहे. “शरद पवार राष्ट्रवादीने एक-दोन जागांसाठी अडून बसू नये. जितेंद्र ननावरे यांच्यावर अन्याय करता येणार नाही. त्यांची उमेदवारी निश्चित आहे आणि तिथे माघार शक्य नाही,” असं बहल यांनी स्पष्ट केलं. तरीही, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असा कटू निर्णय आम्ही घेणार नाही. आघाडी टिकवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सुरू आहेत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात वेगळी स्थिती, पिंपरी चिंचवडमध्ये समन्वयाचा प्रयत्न आज सकाळी पुण्यातील घडामोडींमुळे आघाडी तुटण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात असलं, तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र समन्वयाची भूमिका घेतली जात आहे. काल अजित पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी भेट देत चर्चा केल्याचं समोर आलं आहे. ही चर्चा केवळ औपचारिक नसून, स्थानिक पातळीवर आघाडी टिकवण्याचा गंभीर प्रयत्न असल्याचं राजकीय निरीक्षक मानतात.

एक पाऊल मागे, पण आघाडी पुढे नेण्याचा प्रयत्न

एकूणच, अजित पवार गटाने घड्याळाच्या चिन्हाचा आग्रह सैल करत “आघाडी तुटू नये” याला प्राधान्य दिलं आहे. निवडणूक चिन्हापेक्षा राजकीय एकजूट महत्त्वाची, असा संदेश पिंपरी चिंचवडमधून देण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. आता या सकारात्मक चर्चांना अंतिम रूप मिळतं का, की पुण्यातील तणावाचा परिणाम पिंपरी चिंचवडवरही होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा