थोडक्यात
स्थानिक स्वराज्य संस्थेच्य निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत लढणार का?
पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार
निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का?
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांनी आपआपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये.
एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच आम्ही लढवणार आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं आहे. काही जागा अपवाद असू शकतील तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल, मात्र आमच्यासाठी पहिला पर्याय हा महायुतीच असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
स्थानिक स्वराज्य संस्थेच्य निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत लढणार का? यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नगर परिषदेच्या निवडणुका या स्थानिक स्थरावरच्या असतात. ही निवडणूक लढवण्यासाठी अनेक कार्यकर्ते हे इच्छुक असतात. त्यामुळे मोठ्या निवडणुकीमध्ये महायुती शक्य आहे, मात्र या छोट्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावनात लक्षात घेऊन निवडणुका स्वतंत्र लढलेल्या बऱ्या त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट एकला चलो रे चा नारा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महाविकास आघाडी कशी लढवणार याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. त्यातच राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे, त्यामुळे या निवडणुकीसंदर्भातील उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.