वाकड येथे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या 65 व्या वार्षिक अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या वेळी त्यांनी संघटनेची वाटचाल, द्राक्ष उत्पादकांचे योगदान तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचं विशेष कौतुक केलं.
अधिवेशनात अजित पवार यांच्या हस्ते ‘द्राक्ष वृत्त’ या स्मरणिकेचं प्रकाशन आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संघटनेच्या स्थापनेपासून झालेल्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. “छोट्या सभागृहातून सुरू झालेली बैठक आज मोठ्या प्रमाणावर अधिवेशनांपर्यंत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा नेहमी वाढत जातात आणि त्यानुसार संघटनेने प्रगती साधली आहे,” असं पवार यांनी सांगितलं.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा उल्लेख करताना अजित पवार म्हणाले, “भरणे कुटुंबीय उत्कृष्ट शेती करतात. द्राक्ष, डाळिंब, केळी, ऊस अशा विविध पिकांमध्ये त्यांनी मोठं यश मिळवलं आहे.त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी मिळून उत्तम शेती केली आहे. दर्जेदार शेतीमधून दरवर्षी त्यांच्या शेतातून 15 ते 20 हजार टन ऊस कारखान्याला दिला जातो. त्यांच्या मेहनतीमुळे अनेकांना प्रेरणा मिळते.”
यावेळी थोड्या हलक्या फुलक्या शैलीत अजित पवारांनी भरणेंना उद्देशून म्हटलं, “राज्यात कृषिमंत्र्यांबद्दल नेहमी काही ना काही चर्चा होत असते. पण आता मी ठरवलंय की असा कृषिमंत्री हवा ज्याच्याबाबत काहीच वाद निघू नयेत. त्यामुळे तुमच्याबद्दल काहीच निघून देऊ नका” असे पवार म्हणाले.
शेतकऱ्यांबाबत बोलताना पवार म्हणाले, “महाराष्ट्राच्या विकासात शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. द्राक्ष उत्पादकांच्या समस्या दूर करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल. विषमुक्त अन्नधान्य उत्पादन ही भविष्यातील दिशा आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवे प्रयोग करणे काळाची गरज आहे.