पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, मराठी आपली मातृभाषा आहेच. त्याबद्दल कोणाचे दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे. ती टिकली पाहिजे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला. खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होते. परंतु कुणी करण्याचे धाडस दाखवले नाही. ते मोदी साहेबांनी, एनडीए सरकारने दाखवलं.
आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला चांगल्याप्रकारची वास्तू तयार करण्याचे ठरवले आहे. निधीची कुठलीही कमतरता नाही. हे करत असताना जगात मॅक्झिमम भाषा इंग्रजी ही चालते. तुमच्या आमच्या कुणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचे असेल तर त्याला मराठी आलेच पाहिजे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हिंदीपण चालते. सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात. त्याच्यात ते वेळ घालवतात. तिन्ही भाषांना महत्व पाहिजे. पण शेवटी आपली स्वत:ची मातृभाषा तिला नंबर एकच स्थान आहे. समोरच्या राजकीय पक्षांना कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. असे अजित पवार म्हणाले.