सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर आज (16 ऑगस्ट) राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांच्या शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अंतर्गत प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा प्रारंभोत्सव होणार आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील आणि शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या इस्लामपूरमध्ये हा कार्यक्रम होत असल्याने याचे राजकीय महत्त्व अधोरेखित होत आहे.
अजित पवार गटाकडून गेल्या काही महिन्यांत सातत्याने जयंत पाटलांना त्यांच्या मतदारसंघातच घेरण्याचे प्रयत्न झाले आहेत. याशिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे भाजपचीही ताकद येथे वाढली आहे. त्यामुळे हे नेते जर खरोखरच एकाच व्यासपीठावर आले तर तीव्र राजकीय जुगलबंदी पाहायला मिळेल, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.