98व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होणार आहे. दिल्लीत तीन दिवसीय साहित्य संमेलन पार पडणार असून डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षा आहेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.
यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेतेमंडळी संमेलनात उपस्थिती राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
सरहद, पुणे या संस्थेच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 3.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने 3 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान तालकटोरा स्टेडियममध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस सुरुवात होणार आहे. ग्रंथदिंडीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना परिसरात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.