Akola Violence 
ताज्या बातम्या

Akola Violence : अकोल्यात रात्री दोन गटात राडा; दगडफेक जाळपोळ,शहरात कलम 144 लागू

Akola Violence : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे संतप्त झालेल्या एका गटाने तोडफोड व दगडफेक सुरू करण्यास सुरुवात केली.

Published by : Pankaj Prabhakar Rane

अकोला : अकोला जिल्ह्यातील जुन्या शहरात शनिवारी सायंकाळी दोन गटात तूफान राडा झाला. किरकोळ वादाचं रुपांतर हिंसक हाणामारीत झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेनंतर प्रशासनाने शहरात 144 कलम लागू केले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसक जमावाने काही वाहनांची तोडफोड केली. किरकोळ वादातून झालेल्या हिंसक घटनेनंतर जुने शहर पोलीस ठाण्याजवळ मोठा जमाव जमला होता. या हिंसक जमावाने परिसरातील काही वाहनांना लक्ष्य केले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

परिस्थिती नियंत्रणात

सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अकोल्याचे एसपी संदीप घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अकोला शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात अकोल्यातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अकोट फाईल परिसरात दोन गटात हिंसक हाणामारी झाली होती.

रात्री 11.15 वाजताच्या सुमारास वाद

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे संतप्त झालेल्या एका गटाने तोडफोड व दगडफेक सुरू करण्यास सुरुवात केली. यानंतर दोन गटांत तूफान राडा झाला. जुन्या शहरातील हरिहरपेठ परिसरात हे दोन्ही गट शनिवारी रात्री 11.15 वाजताच्या सुमारास भिडले. त्यानंतर काही लोकांचा जमाव तेथील घरांवर चालून गेला. 

जामावाकडून जाळपोळ

यावेळी जमावाने मोटारसायकलींचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, तर एक घरही पेटवून दिले. या घटनेत एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान जमाव पांगवण्यासाठी गोळीबारही करावा लागला. यानंतर घटनास्थळावर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे पोलिस कुमकसह पोहोचले. रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले.

शहरात संचारबंदीचे आदेश

दरम्यान रात्री 2.30 च्या सुमारास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनीही घटनेचा आढावा घेत जुने शहर, डाबकी रोड, सिटी कोतवाली व रामदास पेठ या भागात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू केल्याचे आदेश काढले. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा