बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बराच काळ टीव्हीपासून दूर असलेला अक्षय कुमार आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तो सोनी टीव्हीवर सुरू होणाऱ्या ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ या प्रसिद्ध गेम शोचं सूत्रसंचालन करणार आहे. या शोचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला गेम शो आहे. जगभरातील सुमारे 60 देशांमध्ये हा शो लोकप्रिय ठरला आहे. अमेरिकेत हा शो सर्वाधिक पाहिला जाणारा मानला जातो आणि आतापर्यंत त्याने 8 एमी पुरस्कार पटकावले आहेत. आता याच शोचं भारतीय रूप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रोमोमध्ये दिसला मजेशीर अंदाज
या शोच्या प्रोमोमध्ये अक्षय कुमार एका हटके भूमिकेत दिसत आहे. ‘तीस मार खान’ चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या अंदाजात तो नोकराच्या भूमिकेत आहे. कथेनुसार, एका श्रीमंत व्यक्तीच्या मृत्यूपत्रात एका छोट्याशा अक्षरामुळे मोठा बदल होतो आणि करोडोंची संपत्ती चुकून मुलाऐवजी नोकराच्या नावावर जाते. या गंमतीशीर प्रसंगातून शब्दांची ताकद किती महत्त्वाची असते, हे दाखवण्यात आलं आहे.
प्रोमोच्या शेवटी अक्षय कुमार सांगतो की, एका छोट्या अक्षरामुळे संपूर्ण आयुष्य बदलू शकतं आणि ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’मध्ये प्रत्येक शब्द आणि अक्षर खूप महत्त्वाचं असणार आहे. हा शो लवकरच सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर सुरू होणार असल्याचंही त्याने जाहीर केलं.
हा गेम शो कसा असतो?
या शोमध्ये स्पर्धकांना एक मोठं चक्र फिरवावं लागतं. त्यानंतर अक्षरे निवडून दिलेलं शब्दकोडं सोडवायचं असतं. योग्य अक्षरं निवडली तर बक्षिसं जिंकता येतात. खेळाडू संपूर्ण कोडं एकदम सोडवण्याचाही प्रयत्न करू शकतो. खेळ जसजसा पुढे जातो, तसतशी बक्षिसांची रक्कम वाढत जाते. सध्या शोच्या भारतीय आवृत्तीबाबत संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार हा शो 2026च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. निर्मात्यांकडून लवकरच अधिक तपशील जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा आहे.
थोडक्यात
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा टीव्हीवर येणार आहेत.
अक्षय कुमार सोनी टीव्हीवर सुरू होणाऱ्या ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ या प्रसिद्ध गेम शोचं सूत्रसंचालन करणार आहेत.
शोचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय गेम शो आहे.
हा शो जगभरातील सुमारे 60 देशांमध्ये प्रसारित होतो.
अमेरिकेत सर्वाधिक पाहिला जाणारा शो आणि आतापर्यंत 8 एमी पुरस्कार जिंकले आहेत.
आता भारतासाठी या शोचं रूप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.