येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या सात जणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांचा थेट परिणाम या राज्यसभा निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सध्याचे विधिमंडळाचे संख्याबळ पाहता महायुतीची ताकद प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे यावेळी राज्यसभेच्या ७ पैकी तब्बल ६ जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता आहे. यात भाजपाला ४, शिंदे गटाच्या शिवसेनेला १ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना १ जागा मिळू शकते. उर्वरित १ जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यसभा निवडणुकीत उमेदवाराला विजयी होण्यासाठी ३७.५ मतांची आवश्यकता असते. मात्र विधानसभेत महाविकास आघाडीची ताकद लक्षणीयरीत्या घटल्याने यापूर्वी त्यांच्या वाट्याला येणाऱ्या ३ जागा यंदा महायुतीकडे सरकल्या आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवत सत्तेवर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. या निवडणुकीत भाजपाचे १३७ आमदार निवडून आले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ६० आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार विजयी झाले. दुसरीकडे, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे गटाला केवळ २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला फक्त १० जागांवर समाधान मानावे लागले. या संख्याबळामुळेच राज्यसभा निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून येतो.
दरम्यान, शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. यावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणं महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचं आहे. ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत,” असे राऊत म्हणाले. पवार यांची आता थांबण्याची मानसिकता असली तरी त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. “पवारांना निवडून आणण्याची ताकद महाविकास आघाडीकडे आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान त्यांच्या पाठीशी आहे. कुणाकडे हात पसरण्याची गरज नाही,” असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. त्यामुळे पवार पुढील राज्यसभा निवडणूक लढवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण १९ जागांपैकी १२ जागा एनडीएकडे तर ७ जागा महाविकास आघाडीकडे आहेत. शरद पवार गटाकडे सध्या शरद पवार आणि फौजिया खान अशा दोन जागा आहेत. या दोघांचाही कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. याच दिवशी ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपाचे धैर्यशील पाटील, भागवत कराड आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर होणारी राज्यसभा निवडणूक केवळ संख्याबळाची नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय दिशादर्शक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
राज्यसभेच्या ७ जागांसाठी रणधुमाळी, महायुतीचा वरचष्मा
राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध होण्याची शक्यता....
विधानसभा निकालांचा राज्यसभेवर थेट परिणाम