सातारा ड्रग्स प्रकरणावरून राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारत एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सातारा येथील ड्रग्स प्रकरणाचा संदर्भ देत आरोपींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण मागवण्यात आल्याचा आरोप केला. हॉटेल तेजयश हे एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे असल्याचा दावा अंधारे यांनी केला असून, यासाठी त्यांनी गुगल मॅप, व्हॉट्सअॅप लिंक आणि ऑनलाईन बुकिंगशी संबंधित माहितीचा थेट लाईव्ह डेमो सादर केला.
‘हॉटेल तेजयश’वर थेट बोट
अंधारे यांनी व्हॉट्सअॅपवरील माहिती दाखवत सांगितले की, संबंधित रेसॉर्टच्या ऑनलाईन बुकिंगमध्ये ‘प्रकाश शिंदे’ हे नाव स्पष्टपणे दिसत आहे. हॉटेल तेजयश हे त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावावरून ठेवण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. “हे सर्व पुरावे समोर असताना आता प्रकाश शिंदे खोटं बोलणार का?” असा थेट सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी ठामपणे मांडली. “जर एखाद्या ठिकाणी सत्तेचा किंवा मंत्रिपदाचा गैरफायदा घेत एखादी व्यक्ती वाचत असेल, तर अशा वेळी संबंधितांनी पदावर राहण्याचा अधिकार गमावला पाहिजे,” असे अंधारे यांनी ठणकावून सांगितले.
शिंदे गटाचा पलटवार, कारवाईचा इशारा या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या राज्यात नगरपालिका आणि महापालिका निवडणुका सुरू असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी वातावरण निर्माण करण्याचा हा केवळ प्रयत्न असल्याचा आरोप देसाई यांनी केला. तसेच सुषमा अंधारे यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अंधारेंचा प्रतिहल्ला
मंत्री शंभूराज देसाई यांच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. “जिल्ह्यावर कोकणचा विळखा पडलेला असताना पालकमंत्री नेमकं काय करत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण सर्व पुरावे सादर केले असताना धमकावण्याचे राजकारण का केले जात आहे, असा प्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केला. “विरोधकांचे कामच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे असते. आम्ही आमचा अधिकार बजावत आहोत आणि प्रश्न विचारत राहणार,” असे सांगत अंधारे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
वाद आणखी चिघळण्याची शक्यता
सातारा ड्रग्स प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद आता थेट राजकीय संघर्षात रूपांतरित होताना दिसत आहे. सुषमा अंधारे यांच्या आरोपांनंतर आणि शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे असून, आगामी काळात या मुद्द्यावर राज्याचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.