ताज्या बातम्या

अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरण, पंढरीनाथ फडके यांची तक्रार न घेण्यासाठी राजकीय दबाव

Published by : shweta walge

मयुरेश जाधव, अंबरनाथ : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांच्यावर आधी राहुल पाटील यांच्याकडून गोळीबार झाल्याचा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पंढरीनाथ फडके समर्थकांनी गोळीबार केल्याचा दावा पंढरीनाथ फडके यांच्या वकिलांनी केला आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून पंढरीनाथ फडके यांची तक्रार नोंदवून घेतली जात नसून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप फडके यांच्या वकिलांनी केला आहे.

अंबरनाथमध्ये रविवारी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणच्या आडीवली गावातील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओत फडके यांचे समर्थक राहुल पाटील यांच्या गाड्यांच्या दिशेने गोळीबार करत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र सुरुवातीला राहुल पाटील यांच्या बाजूने फडके यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून फडके यांच्याकडून गोळीबार करण्यात आला, असा दावा पंढरीनाथ फडके यांचे वकील ऍड. उमेश केदार यांनी केला आहे. याबाबत स्वतः पंढरीनाथ फडके यांनी न्यायालयात तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून फडके यांच्या वकिलांनी पोलिसांकडे तक्रारीचा लेखी अर्ज देखील सादर केला. मात्र या गोष्टीला आता चार दिवस उलटूनही पोलिसांकडून फडके यांची तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नाही. दोनही बाजूंनी गोळीबार झाल्यामुळे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करणं गरजेचं असतानाही पोलीस मात्र फक्त एकाच बाजूने गुन्हा दाखल करून पक्षपातीपणा करत असल्याचाही आरोप पंढरीनाथ फडके यांच्या वकिलांनी केला आहे.

ऍड. उमेश केदार, पंढरीनाथ फडके यांचे वकील

दरम्यान या सगळ्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना विचारलं असता, आम्हाला तक्रार अर्ज प्राप्त झाला असून त्यावर तपास सुरू आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सध्या यावर काहीही बोलणं उचित ठरणार नाही, असं म्हणत त्यांनी अधिक प्रतिक्रिया देणं टाळलं. तर कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यासही त्यांनी असमर्थता दर्शवली. या संपूर्ण प्रकरणात फेरतपास करण्यासह फडके यांच्या बाजूने सुद्धा गुन्हा दाखल करावा आणि जे जे दोषी असतील त्या सर्वांना अटक करावी. पंढरीनाथ फडके हे जर दोषी असतील, तर त्यांना न्यायालय शिक्षा देईलच. मात्र पंढरीनाथ फडके यांच्या बाजूनेही गुन्हा नोंदवला गेलाच पाहिजे, अशी मागणी फडके यांच्या वकिलांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हा दाखल होतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना