मुंबईत गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी ‘इंडिया मेरीटाईम वीक 2025’चा भव्य शुभारंभ होणार आहे. या पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा करतील. तसेच भारताच्या जागतिक समुद्री नेतृत्वाकडे वाटचालीवर ते महत्त्वपूर्ण कीनोट भाषणही देणार आहेत. शहा रविवारी रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वागत करतील.
ही भव्य परिषद बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय तसेच इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. भारताची समुद्री क्षमता, व्यापाराची ताकद आणि ‘ब्लू इकॉनॉमी’ विकसित करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. इंडिया मेरीटाईम वीक 2025 दरम्यान समुद्री क्षेत्रातील नामवंत उद्योगपती, गुंतवणूकदार, धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. टिकाऊ समुद्री वाढ, व्यापार विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीवर चर्चा होणार आहे.
कार्यक्रमात आधुनिक बंदर व्यवस्थापन, हरित जहाजवाहतूक, डिजिटल लॉजिस्टिक्स, क्रूझ पर्यटन, तसेच बंदर-आधारित औद्योगिक विकास या विषयांवर प्रदर्शन, पॅनेल चर्चा आणि संवाद सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. हा उपक्रम ‘मरीटाईम इंडिया व्हिजन 2030’ आणि ‘मरीटाईम अमृतकाल व्हिजन 2047’ या राष्ट्रीय धोरणांशी सुसंगत आहे. भारताच्या सुमारे 95 टक्के व्यापाराची वाहतूक बंदरांमार्फत होते, यामुळे या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, जागतिक सहकार्य आणि सागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ‘सागरमाला’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतही याचा थेट फायदा होणार आहे.
या कार्यक्रमात 100 हून अधिक देश, 500 प्रदर्शनकर्ते आणि जवळपास 1 लाख प्रतिनिधी सहभागी होतील, असा अंदाज असून, दक्षिण आशियातील हा सर्वात मोठ्या समुद्री परिषदमध्ये गणला जाईल. यावेळी अनेक बी2बी मीटिंग, सामंजस्य करार आणि धोरणात्मक चर्चांमधून ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.