नेरुळमध्ये आज मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भेटीमुळे मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प्रकरणी पोलिसांनी बजावलेल्या नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या आगमनापूर्वीच मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोर जमून शक्तीप्रदर्शन केले.
गेल्या रविवारी नेरुळ येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण रखडल्याची माहिती मिळताच अमित ठाकरे यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन पुतळ्याचे अनावरण केले होते. याच प्रकरणात नेरुळ पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. नोटीस स्वीकारण्यासाठी ते घरी नसल्याने अमित ठाकरे यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.
आज नेरुळमध्ये पोहोचल्यावर त्यांनी प्रथम शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि त्यानंतर मनसैनिकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “मनसैनिकांच्या पाठिंब्यामुळेच या प्रकरणाचा सामना करण्याचा आत्मविश्वास मिळाला. महाराष्ट्रासाठी काम करताना कितीही दडपण आले तरी महाराजांचे आशीर्वाद असतील तर अडथळे दूर होतात.”
यावेळी अमित ठाकरे यांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा मोठा उपक्रम सुरू करण्याची घोषणाही केली. महाराजांचे किल्ले जगासमोर आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नेरुळमध्ये झालेल्या या घडामोडींमुळे परिसरात दिवसभर राजकीय वातावरण तापले होते. पुढील हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नेरुळमध्ये झालेल्या या घडामोडींमुळे परिसरात दिवसभर राजकीय वातावरण तापले होते. पुढील हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.