रशियाच्या कामचाटका परिसरात सोमवारी (30 जुलै) सकाळी 8.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर संपूर्ण प्रशांत महासागर परिसरात त्सुनामीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या भीषण भूकंपामुळे रशियासह जपान, अमेरिका, हवाई, फिलीपिन्स, इक्वाडोर, पेरू, चिली, गुआम, सोलोमन आयलंड्स, नॉर्दर्न मारियाना आणि न्यूजीलंड या 12 हून अधिक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनात खळबळ माजली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
जपानने तात्काळ फुकुशिमा अणुप्रकल्प रिकामा केला आहे. 2011 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे या अणुप्रकल्पात प्रचंड हानी झाली होती आणि हजारो लोकांचा जीव गेला होता. त्या भीषण आठवणी लक्षात घेता, यंदा कोणतीही जोखीम न घेता जपानने सावधगिरीचा उपाय म्हणून अणुप्रकल्प बंद करून कर्मचार्यांना बाहेर काढले आहे.
चीनलाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून शांघायमध्ये 2.8 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हवाई बेटांवरील आणि समुद्रकिनाऱ्यांजवळील नागरिकांना हटवले असून एअरपोर्टदेखील बंद करण्यात आला आहे. न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अद्याप मोठ्या लाटा आलेल्या नसल्या तरी प्रशासनाने हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच भारतावर सध्या थेट त्सुनामीचा धोका नसला तरी भारतीय किनाऱ्यालगतच्या राज्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशांत महासागरातील अस्थिरतेचा परिणाम दूरवरच्या किनारपट्ट्यांवरही दिसून येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जगभरात त्सुनामीसंदर्भात हाय अलर्ट देण्यात आलेला असताना, प्रशासन, बचाव पथकं आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली आहेत. नागरिकांनीही अफवांपासून दूर राहून अधिकृत सुचनांचं पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.