पुरोगामी महाराष्ट्रात सध्या अघोरी विद्येच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील उदगाव वैकुंठधाम येथे असाच एक अघोरी कृत्याचा प्रकार समोर आला आहे. एक महिला आणि एक पुरुष भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामती करत असल्याचे उघड झाले आहे. या सगळ्या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करुन काळी बाहुली, नारळ आणि नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही समोर येताच यामध्ये एक महिला आणि पुरुष नग्न होऊन करणी आणि भानामती करत असल्याचे समोर आले. आमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.