सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. अशाच काही सायबर भामट्यांनी बोगल ई-मेल आयडी तयार करून अंधेरीतील एका कंपनीची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बोगस ई-मेल आयडी तयार करून दीड कोटी रुपयांची फसवणूक
परदेशी कंपनीशी साधर्म्य असलेला ई-मेल आयडी तयार करून अंधेरीतील कंपनीची सुमारे दीड कोटी रुपयांची सायबर फसणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने अंधेरीतील तक्रारदार कंपनीच्या अधिकाऱ्यांचेही ई-मेल हॅक केले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात तोतयागिरी करणे व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी पश्चिम येथील कंपनीने याप्रकरणी अंबोली पोलिसांकडे नुकतीच तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
कशी केली फसवणूक?
तक्रारदार कंपनी रसायन क्षेत्रातील आहे. आरोपींनी ६ डिसेंबर २०२४ रोजी तक्रारदार कंपनीतील वरिष्ठ निर्यात व्यवस्थापक मंगला कामत व व्यवसाय विकास व्यवस्थापक अंगद सिंह यांचा अधिकृत ई-मेल हॅक केला. त्यानंतर या कंपनीची ग्राहक कंपनी असलेल्या इजिप्त कॅनेडियन कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला ई-मेल तयार केला. हॅक केलेल्या ई-मेद्वारे आरोपी परदेशी कंपनीबरोबर संपर्क साधायचा. बनावट ई-मेलद्वारे अंधेरीतील कंपनीशीही तो संपर्क साधत होता.