एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे, संतापलेल्या शिक्षकांनी 8 आणि 9 तारखेला राज्यव्यापी शाळा बंदची हाक दिली आहे. शिक्षकांच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शिक्षणसंस्थांवर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून अनुदानाचा प्रश्न जैसे थे वरच आहे. अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा अजूनही मिळालेला नाही. आधीही ह्या मागणीसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी 1 ऑगस्ट 2024 पासून सलग 75 दिवस विविध ठिकाणी राज्यव्यापी आंदोलने केली होती. या आंदोलनांची सरकारने गंभीर दखल घेत सकारात्मक प्रतिसादही दिला. मात्र त्यानंतरही त्यांना वाढीव अनुदान काही मिळाले नाही.
10 ऑक्टोबर 2024 रोजी तात्कालीन मुख्यमंत्रांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. पण 14 ऑक्टोबर 2024 रोजी निघालेल्या GR मध्ये अनुदानाचा उल्लेखच नव्हता.त्यातच आता एक उलटूनही यावर काहीच तोडगा निघाला नाही कि वाढीव अनुदानही दिले गेले नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांनी आता आक्रमक पवित्र घेत पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यानुसार 8 आणि 9 जुलै रोजी विविध शाळांमधील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र येणार असून तिथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने होणार आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना,संयुक्त मुख्याध्यापक संघटना,राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी याला पूर्ण पाठिंबा दिला आहे.शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा शाळा बंद आंदोलनाचं हत्यार उचलण्यात आलं असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.