पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी गाैरी पालवे गर्जे हिने आत्महत्या केली. गाैरीच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप करत म्हटले की, ज्यावेळी गाैरीने आत्महत्या केली, त्यावेळी अनंत गर्जे हा घरीच होता. मात्र, अनंतकडून स्पष्ट करण्यात आले की, मी घरी नसताना गाैरीने आत्महत्या केली. तिने दरवाजा बंद केला होता आणि 31 व्या मजल्यावरून मी 30 व्या मजल्याच्या आमच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला, त्यावेळी तिने आत्महत्या केल्याचे समजले. मी तिला घेऊन रूग्णालयात पोहोचलो. आता या प्रकरणात गंभीर आरोप केली जात असून मागील काही महिन्यांपासून गाैरी आणि अनंत यांच्यामध्ये वाद सुरू होता. हेच नाही तर यादरम्यान गाैरीला अनंतकडून मारहाण होत होती. गाैरीने तिच्या कुटुंबियांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आणि काही पुरावेही पाठवली होती.
आता गाैरी पालवे गर्जे प्रकरणात अंजली दमानिया यांनी मोठे भाष्य केले. अंजली दमानिया यांनी म्हटले की, अनंत गर्जेला अटक केल्याची माहिती मिळतंय. त्यामध्ये मला गाैरीच्या गावाकडून फोन येत आहेत. गाैरीच्या अंत्यविधीसाठी प्रचंड तमाशे सुरू आहेत. मला गाैरीच्या मामाने सांगितले की, त्यांच्या सर्व नातेवाईकांनी ठरवले की, अनंत गर्जेच्या घरासमोरच हा अंत्यविधी करायचा. पण मला खरंतर हे अजिबात पटलेले नव्हते. त्यांनी जर मला अगोदर विचारले असते तर हे असे करू नका मी त्यांना सांगितले असते.
दोन्ही बाजुंच्या नातेवाईकांमध्ये अगोदर बाचाबाची झाली आणि मग त्यांनी मिळून ठरवले की, घरापासून थोड्या अंतरावर अंत्यविधी करायचा आणि तो झाला. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी राजकारण होताना दिसतंय. काल देखील पोलिस स्टेशनमध्ये मला बीडच्या काही लोकांनी सांगितले की, एक व्यक्ती तिथे आला आणि म्हटले की, तुमचा एक माणूस द्या आमचा एक देतो. हे सर्व सेटल करू. हे सर्व ऐकल्यावर मला अतिशय चीड आली होती.
पंकजा मुंडे यांचा पीए आहे म्हणून हे सर्व प्रकरण दाबले जात असेल तर हे सर्व करू देणार नाही. मला तर पंकजा मुंडेंकडून ही अपेक्षा होती की, काल त्यांचे हे म्हणणे होते ते मी ऐकले. काल त्यांनी म्हटले की, साडेसहा ते पावने सातदरम्यान मला याबद्दल माहिती मिळाली… मग पंकजा ताई तुम्ही मग त्या पालवे कुटुंबियांना काय मदत केली. तुमच्याच आडनावाचे ते कुटुंबिय होते. तुम्ही का मदत केली नाही?
तुम्ही काल का तात्काळ पोलिस स्टेशनमध्ये गेला नाहीत. जी सासरची माणसे होती ती देखील ना पोलिस स्टेशनमध्ये होती ना हॉस्पिटलमध्ये. ती जर केवळ आत्महत्या असती तर असे झाले नसते. तुम्ही त्यांना मदत करणे गरजेचे होते. पोलिसांना बोलणे महत्वाचे होते. अंत्यविधीला उपस्थित राहणे गरजेचे होते. जर तुम्ही लग्नात होतात… पुत्र समान मुलगा तुमचा तो होता तर मग त्याची बायको गेली तर तुम्ही तिथे का नव्हता, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.