सामाजिक कार्यकर्त्या आणि माहिती अधिकारी अंजली दमानिया यांनी गुरुवारी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीत जाऊन मनोज पाटील जरांगे यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हेदेखील उपस्थित होते. जालन्यात आल्यानंतर चांगल्या लोकांच्या भेटीच्या उद्देशाने आपण जरांगे पाटील यांच्या भेटीला आलो असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच एप्रिलच्या अखेरीस २६ किंवा २७ रोजी पुन्हा एकदा जालन्यात येणार असल्याचे अंजली दमानिया यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या की, "आताच्या घडीला सगळीकडे अन्याय होताना दिसतोय. बीडमध्ये जे झालं ते जालन्यात पण झालं. राजकारणी खरंच काम करतात का. सगळे राजकारणी एका माळेचे मणी आहेत. एडीआर नावाच्या संस्थेचा रिपोर्ट्स आला असून यात ११८ निवडून गेलेल्या आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या गाड्या मंत्रालयात जातात, परंतू सामान्य लोकांना जायला त्रास होतो. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस सेल्युट करतात. मुंबईमध्ये काही ठिकाणी पडक्या इमारतींमध्ये वीज कापतात, पाणी कापतात. हा सामान्यांवर अन्याय आहे."
धनंजय मुंडेंविरोधात आज अनेक पुरावे सादर करणाऱ्या दमानिया यांनी आजही धनंजय मुंडेंवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, "धनंजय मुंडेंचा पार्टनर राजेंद्र घनवट आहे. त्यांनी शेतकऱ्यांची लूट केली आहे. धनंजय मुंडे, राजेंद्र घनवट आणि संजय खोतकर यांचे एकत्रित फोटो आहेत. या सर्व अन्यायाविरोधात सगळ्यांनी मिळून मोठा लढा उभा करायचं आहे. मी पूर्ण ताकतीने तुमच्या बरोबर उभी राहणार आहेत."