अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचे पती व उद्योगपती विकी जैन यांचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हातात काचेचे तुकडे रुतल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी त्यांच्या हातावर तब्बल 45 टाके घातले आहेत.
मागील तीन दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या विकीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या मित्राने सोशल मीडियावर दिली आहे.
चित्रपट निर्माता संदीप सिंग यांनी रुग्णालयातील काही छायाचित्रे व व्हिडीओ शेअर करत विकीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, गंभीर जखमी असूनही विकी सतत हसतमुख राहतात आणि आजूबाजूच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवतात. या काळात अंकिता लोखंडे सतत पतीच्या सोबत राहून त्यांची काळजी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अजूनही अपघात नेमका कुठे आणि कसा झाला याविषयी स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र या घटनेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून विकीच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी 2021 मध्ये विवाह केला. त्याआधी दोघे काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ‘स्मार्ट जोडी’ व ‘बिग बॉस 17’सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये या जोडप्याने एकत्र भाग घेतला होता.