मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २५) मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन 2024-2025 या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नवे नियुक्त सदस्य कोण असतील याची यादीच पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप विधीमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या संमतीनं समित्यांचे नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं पक्षाने सांगितलं आहे.
सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदी पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातील भाजपचे नेते राहुल कुल यांची वर्णी लागली आहे. तर पंचायत राज समितीच्या अध्यक्ष पदी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे-पाटील यांची वर्णी लागली आहे. तर आश्वासन समितीच्या अध्यक्ष पदावर रवी राणा यांची, तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष पदी नारायण कुचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती कल्याण समितीवर राजेश पाडवी, तर महिला हक्क व कल्याण समितीवर मोनिका राजळे या अध्यक्ष राहणार आहे. इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर किसन कथोरे, मराठी भाषा समिती पदावर अतुल भातखळकर, विशेष हक्क समितीवर राम कदम, धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समितीवर श्रीमती नमिता मुंदडा, आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्ष पदावर सचिन कल्याणशेट्टी हे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहे.