बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरुच आहे. एसआयटी, सीआयडीकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. आतापर्यंत पोलिसांनी ८ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये?
सरपंच संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेल्याचे समोर आलं आहे. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे. पाषाण येथे CIDच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मीक कराड आला ती गाडी याच ताफ्यातील होती. पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे.
काय आहे घटनाक्रम?
वाल्मीक कराड आणि इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेल्याचे समोर आले आहे.
याबाबतीत पुष्टी देणारे ३ आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
३० डिसेंबरच्या रात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर ३ आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे.
बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले. तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले.
याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेले असल्याची चर्चा आहे.
तसेच याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शक्यता आहे.
पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मीक कराड आला; ती गाडी याच ताफ्यातील होती.