सीएसएमटी, कुर्ला, घाटकोपर, ठाणे आणि दादर ही मुंबईतील सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके मानली जातात. दररोज लाखो प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करतात. वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वे वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने दादर रेल्वे स्थानकावर एक नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन प्लॅटफॉर्म पश्चिम रेल्वेच्या विद्यमान प्लॅटफॉर्म क्रमांक ७ च्या शेजारी उभारण्यात येणार असून, त्यामुळे विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार आहे.
दादर रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गांसाठी अत्यंत महत्त्वाचे जंक्शन आहे. रोज सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवासी येथून प्रवास करतात. सध्या दादर स्थानकावर पश्चिम रेल्वेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ७ उपलब्ध आहेत, तर मध्य रेल्वेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ८ ते १४ वापरले जातात. पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ ला नवीन प्लॅटफॉर्म जोडल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांची हाताळणी अधिक सुलभ होणार आहे.
या नव्या प्लॅटफॉर्मला ‘७अ’ (7A) असा क्रमांक देण्याचा विचार पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत आहे. जर हा प्लॅटफॉर्म मध्य रेल्वेला देण्यात आला, तर स्थानकावरील अनेक प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलावे लागतील. त्याचा परिणाम साइनबोर्ड, सार्वजनिक घोषणा प्रणाली आणि प्रवाशांच्या दिशादर्शक फलकांवर होऊ शकतो. ही अडचण टाळण्यासाठीच नवीन प्लॅटफॉर्मला ७अ असा क्रमांक देण्याचा पर्याय विचाराधीन आहे. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
सध्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या दादर स्थानकावरून सुटतात किंवा येथेच थांबतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मर्यादित टर्मिनल लाईन्स उपलब्ध असल्याने भविष्यात सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या गाड्यांचे व्यवस्थापन करणे अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळेच प्लॅटफॉर्म क्रमांक ७ च्या शेजारी आणखी एक प्लॅटफॉर्म उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या नवीन प्लॅटफॉर्ममुळे भविष्यात वाढणारी प्रवासी संख्या आणि रेल्वे गाड्यांची संख्या अधिक परिणामकारकपणे हाताळता येईल. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक अधिक सुरळीत राहण्यास मदत होईल. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उचललेले हे पाऊल दादर स्थानकावरील ताण कमी करण्यास उपयुक्त ठरणार आहे.