“Anything can happen in politics”, Bala Nandgaonkar's suggestive statement 
ताज्या बातम्या

Bala Nandgaonkar : “राजकारणात काहीही होऊ शकतं”, बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे आता मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापन देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

Published by : Riddhi Vanne

महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळत असून, कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे आता मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापन देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. केडीएमसीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मनसेच्या नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या काळात हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध जोरदार लढत होते.

दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर, शिंदे गट-मनसे युतीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. “कल्याण-डोंबिवलीत जे घडलं, तेच मुंबईतही घडणार का?” हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेलं सूचक विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

“राजकारणात काहीही होऊ शकतं” – बाळा नांदगावकर

केडीएमसीसारखीच परिस्थिती मुंबईत निर्माण होईल का, असा सवाल केला असता बाळा नांदगावकर यांनी त्यावर थेट उत्तर देण्याचे टाळले. “यावर आत्ता भाष्य करणे योग्य नाही. कारण राजकारणात काहीही होऊ शकते,” असे सूचक विधान त्यांनी केले. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार नेत्यांना दिलेले असून, त्यानुसारच निर्णय घेतले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी इतर ठिकाणच्या राजकीय उदाहरणांचा उल्लेख करत सांगितले की, चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आले, तर कोकणात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली. त्यामुळे स्थानिक राजकारणात अशा अनपेक्षित घडामोडी घडत असतात, असे ते म्हणाले. ठाकरे बंधूंना स्थानिक राजकारणाचा मोठा अनुभव असून, कुठे कोणते निर्णय घ्यायचे याचे भान त्यांना आहे, असेही नांदगावकर यांनी नमूद केले.

केडीएमसीतील निर्णयावर पक्ष कारवाईचे संकेत

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेबाबत पक्षांतर्गत नाराजी असल्याचे संकेतही बाळा नांदगावकर यांनी दिले. “जे घडलं आहे, त्यावर पक्ष कारवाई करू शकतो. त्या संदर्भातील निर्णय योग्य वेळी घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मनसेकडून काही शिस्तभंगाची कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे नाराज, नगरसेवकांना धीर

दरम्यान, केडीएमसीतील मनसे आणि शिवसेना (उबाठा) नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना धीर देत, विरोधी पक्षात बसलो तरी सन्मानजनक वागणूक मिळेल, यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. दोन्ही बाजूंनी प्रस्ताव येत असल्याचे नगरसेवकांनी सांगितल्यानंतर, कोणताही निर्णय पक्षपातळीवरच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मनसेच्या स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. “मनसे आणि आमचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते, तर कल्याण-डोंबिवलीत एक मजबूत विरोधी गट उभा राहिला असता. हा निर्णय घ्यायला नको होता,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी अधिक महत्त्वाच्या ठरत असून, केडीएमसीचा पॅटर्न मुंबईत लागू होणार की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

थोडक्यात

• महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील राजकारणाला नवी कलाटणी
• कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) मधील घडामोडी चर्चेचा केंद्रबिंदू
• KDMC मधील घडामोडींमुळे मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनावरही चर्चा
• मनसेच्या नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा
• या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
• निवडणुकीच्या काळात शिवसेना (शिंदे गट) आणि मनसेमध्ये जोरदार संघर्ष होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा