थोडक्यात
मुंबईच्या विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली
७१ प्रवाशांना घेऊन निघालेल्या स्पाइसजेटच्या SG2906 या विमानाचं चाक हवेतच निखळलं
काही क्षणांसाठी भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली होती
विमानप्रवास नेहमीच वेगवान आणि सुरक्षित मानला जातो. मात्र तांत्रिक बिघाड झाल्यास किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याचं प्रत्यंतर शुक्रवारी मुंबई विमानतळावर आलं. ७१ प्रवाशांना घेऊन निघालेल्या स्पाइसजेटच्या SG2906 या विमानाचं चाक हवेतच निखळलं. त्यामुळे काही क्षणांसाठी भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र महिला पायलटच्या कौशल्यपूर्ण निर्णयामुळे आणि तत्परतेमुळे हे संकट टळलं आणि विमान सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर उतरवलं गेलं.
मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचं चाक सुटलं असल्याचं लक्षात आलं. परिस्थिती गंभीर असल्याचं जाणवताच महिला पायलटने तातडीने मुंबई विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधत आपत्कालीन लँडिंगची विनंती केली. त्यानंतर विमानतळावर तातडीने धावपट्टी सज्ज करण्यात आली. प्रशासनाच्या समन्वयातून विमान सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं. या विमानात ७१ प्रवासी आणि दोन केबिन क्रू सदस्य प्रवास करत होते. सर्व प्रवासी सुखरूप असून कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
या घटनेदरम्यान काही काळासाठी मुंबई विमानतळावरील इतर उड्डाणे थांबवण्यात आली होती. धावपट्टीवरील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा विमान वाहतूक सुरू करण्यात आली. तथापि, या प्रसंगामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षित लँडिंगनंतर मात्र प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गेल्या काही दिवसांपासून विमान अपघात आणि तांत्रिक बिघाडाच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विमान कंपन्यांच्या तांत्रिक देखभाल आणि तपासणी यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, विमानसेवा कंपन्यांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं. कारण प्रवाशांचा जीव हा कोणत्याही दुर्लक्षामुळे धोक्यात येऊ नये. या घटनेत सर्वजण सुरक्षित बचावले, हा दिलासादायक भाग असला तरी वारंवार होणाऱ्या अशा प्रसंगांनी विमानप्रवासावरील विश्वास डळमळीत होत असल्याचं स्पष्ट होत आहे.