ताज्या बातम्या

Ahilya Nagar : Special Report On Artists कला केंद्रात कलावंतांचा 'खेळ मांडला'; पोटासाठी पायात घुंगरू,मनात घुसमट...

कलावंत दु:ख: कला केंद्रात लावणी, तमाशा जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कलावंतांची व्यथा.

Published by : Team Lokshahi

तमाशा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्रात सध्या जत्रांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे तमाशा आणि लावणीची पर्वणी गावोगावी मिळते असून अशातच, महाराष्ट्रात अनेक कला केंद्रांमधून लावणीची आणि तमाशाची कला जिवंत ठेवली जाते. मात्र कला केंद्रात कला सादर करणाऱ्या कलावंतांच्या नशिबी मात्र दु:ख आणि वेदना पदोपदी पेरली गेली आहे. त्यामुळे या कलावंतांना मानधन सुरू करून त्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी केली जाते.

रोज सकाळी उठायचं मेकअप करायचा. पायात घुंगरू बांधायचे. पोटासाठी दोन वेळच्या घासासाठी वणवण फिरायचे. मेकअप करताना रडत येणाऱ्या पोटच्या लेकरांना बाजूला सारायचं कशासाठी. त्याच चिमुकल्या पोटच्या पोरांच्या भविष्यासाठी आहे. पोरांना खाऊपिऊ घालून झोपवायचे. लेकरू झोपलं की पायात घुंगरू बांधायचे आणि अखेरीस खेळ मांडायचा. आयुष्याचा जगण्याचा आणि भोगण्याचाही हा असा भोगण्याचा सोहळा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरा होतो.

प्रत्येक कला केंद्रांमध्ये डोळ्यांतले अश्रू लपवत ओठांवर खोटं हसू आणत. कारण या सगळ्या कलावंतांच्या मनात एक सल आहे. ती म्हणजे सन्मानाची अहिल्यानगरमध्ये 15 हून अधिक कला केंद्र आहेत. तशी ती महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात आहेत. शेकडोच्या संख्येनं एकीकडे अनधिकृतपणे सुरू असलेल्या डान्सबारमधल्या मुलींकडे पाहिलं जातं, तसंच या कलाकेंद्रांतील महिलांकडे बघितलं जाते. हीच ती खंत आहे प्रत्येक कलावंताची त्यामुळे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाही तर, ही कला नाचत नाचतच जीव सोडते की काय? अशी भीती या कलावंतांच्या मनात आहे. कुणाला आपल्या लेकराला डॉक्टर बनवायचंय, कुणाला इंजिनीअर बनवायचे तर कुणाला आपल्या मायबापाला दवाखाना काढायचा आहे, म्हणून तर हा सगळा पसारा मांडला गेला.

महिला कलावंत यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस त्या म्हणाल्या की, "सध्या कला केंद्रात कला सादर करणाऱ्या कलावंतांची परिस्थिती हालाखीची आहे. दिवसभर नाचगाणं करत घाम गाळूनही पदरात पडतायत अवघे, दोनशे ते तीनशे रुपये त्यात स्वतःचा आणि कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा? हा सवाल त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. म्हणूनच, कला केंद्रातील कलावंतांना मानधनाचा आधार मिळावा, अशी मागणी केली जाते आहे."

रवींद्र काळे, ढोलकी वादक आणि माजिद खान, पेटी वादक यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस त्या म्हणाले की, "गेल्या 22 वर्षांपासून भरत पालवे कलाकेंद्र चालवतात. त्यांच्या या कला केंद्रात चाळीसहून अधिक महिला आणि त्यांचे कुटुंब असे 70 ते 80 जण उदरनिर्वाह करतात. त्यातच या कलेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा झाल्याने ही कला बदनामीच्या ढगाखाली अविरत सुरू आहे. त्यामुळे, ही कला जिवंत राहावी यासाठी सरकारने काहीतरी करावं अशी अपेक्षा ते करतात.

जय भवानी कला केंद्रांचे मालक भरत पालवे यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस त्या म्हणाले की, तमाशा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. लावणी तर महाराष्ट्राचं लावण्य आहे. अस्सल गावरान लावणीची नजाकत महाराष्ट्राने आपल्या कपाळी अभिमानाने मिरवली. याच महाराष्ट्राच्या मातीत तमाशा आणि लावणीला राजाश्रयही मिळाला. गेल्या शेकडो वर्षांपासून तमाशा महाराष्ट्राचं मनोरंजन करत राहिला. लावणीने महाराष्ट्रातील अनेकांचे फेटे आणि टोप्या उडवल्या. हशा आणि टाळ्यांचा पाऊस पडला. पण या पावसात कलावंतांच्या डोळ्यांतले अश्रू मात्र विरघळून गेले. त्यांचं दु:ख, त्यांची वेदना मात्र तशीच ठसठसत राहिली. म्हणूनच, कलाकेंद्रात ही कला जिवंत ठेवणाऱ्या, त्यासाठी धडपडणाऱ्या कलावंतांना सरकारने आता आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबीर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा

Neeraj Chopra : जागतिक स्पर्धेत नीरज आठव्या स्थानी; तर सचिन यादवची लक्षवेधी कामगिरी

Uttarakhand landslide : उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू; सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती