बॉलिवूडमधील अजरामर अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील गंभीर आणि अनोळखी संघर्ष उघड केला आहे. ‘लेहरन रेट्रो’ या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की त्यांना केवळ एकदा नव्हे, तर दोन वेळा स्तनाच्या कर्करोगाचा (ब्रेस्ट कॅन्सर) सामना करावा लागला. 2015 साली अरुणा ईराणी यांना प्रथम ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. डॉक्टरांनी सुरुवातीला त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र, त्यांच्या अंतःकरणाने सतत वेगळा इशारा दिला. शेवटी त्यांनी स्वतः पुढाकार घेत गाठ काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी केमोथेरपी घेण्यास नकार दिला, कारण त्यांना वाटलं की यामुळे त्यांचं अभिनय करियर अडचणीत येईल. केस गळतील, त्वचा खराब होईल. त्यांनी गोळ्यांवर आधारित उपचार निवडले.
त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा एकदा कॅन्सरची पुनरावृत्ती झाली. यावेळी मात्र त्यांनी मागच्या वेळचा अनुभव लक्षात घेऊन केमोथेरपीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, "ही माझी चूक होती की मी पहिल्यांदा केमो घेतली नाही. यावेळी मात्र मी ती घेतली आणि योग्य निर्णय घेतला." अरुणा ईरानी म्हणाल्या, "केमोमुळे केस गळाले, पण थोड्याच वेळात परत आले. आधुनिक उपचारांमुळे सगळं शक्य आहे." आज वयाच्या 78 वर्षांनंतरही त्या तितक्याच ऊर्जेने काम करत आहेत. त्यांच्या या संघर्षातून मिळणारी लढवय्या वृत्ती आणि सकारात्मकता ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.