5 फेब्रुवारी 2025 रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. आज 8 फेब्रुवारीला या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या आकडेवारीपासूनच, भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत होते. भाजपला बहुमत मिळताना दिसून आलं. 2025 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप वरचढ ठरला आहे. त्यामुळे आपची जादूदेखील कमी झाली आहे. तब्बल 13 वर्ष आम आदमी पक्षाचे दिल्ली मध्ये वर्चस्व होतं मात्र या निवडणुकीत भाजप पक्षाचा विजय झाला आहे. याचपार्श्वभूमिवर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर आला आहे. जनतेचा जो काही निर्णय आहे तो आम्ही विनम्रतेने स्वीकारत आहोत. जनतेचा निर्णय हा शिरसावंद्य आहे. मी भाजपला या विजयासाठी खूप शुभेच्छा देतो. मला आशा आहे की लोकांनी त्यांना ज्या आश्वासनांसाठी मतदान केले आहे, त्या सर्व आशा भाजपकडून पूर्ण केल्या जातील, अशी इच्छा व्यक्त करतो. आम्हाला जनतेने गेल्या 10 वर्षात जी संधी दिली या काळात आम्ही बरीच चांगली कामे केली. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज अशा विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाचं काम केलं. तसेच विविध माध्यमातून जनतेला दिलासा देण्यासाठी कामे केली".
"आता जनतेने निकाल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. आम्ही फक्त सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर आम्ही समाजसेवा, जनतेच्या सुख, दु:खात मदत करणं, ज्यांना मदती हवी असेल त्यांच्या मदतीला आम्ही जावू. आम्ही राजकारणाला फक्त एक माध्यम मानतो, ज्याद्वारे जनतेची सेवा केली जाऊ शकते. आम्ही ते काम करत राहू, आम्ही राजकारणाला फक्त एक माध्यम मानतो, ज्याद्वारे जनतेची सेवा केली जाऊ शकते. आम्ही ते काम करत राहू".