संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू असताना शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. “पाकव्याप्त काश्मीर (PoK) जिंकण्याची संधी असताना मोदींनी बिनशर्त युद्धबंदी का जाहीर केली?” असा थेट सवाल त्यांनी लोकसभेत उपस्थित केला.
सावंत म्हणाले, “भारत युद्ध जिंकण्याच्या स्थितीत असताना, पाकिस्तान दोन भागांत फुटण्याची शक्यता होती, पण तरीही माघार घेतली गेली. इंदिरा गांधींनी जेव्हा 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केले, तेव्हा संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा होता. तसंच मोदींनी केलं असतं, तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो.”
ते पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधानांनी बिहारमध्ये इंग्रजीत भाषण केलं – ते जगाला दाखवण्यासाठी होतं का? “ढोल बडवण्याऐवजी, पहलगाम किंवा मणिपूरला भेट का दिली नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मोदींच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका करत सावंत म्हणाले की, “भारताच्या बाजूने आज एकही देश उभा नाही. इराणसारखा पारंपरिक मित्र देशही आपल्यापासून दूर गेला. कॅनडा, तुर्कस्तान, अमेरिका व चीन पाकिस्तानसोबत उभे राहिले, तर सार्क देशही भारतापासून तटस्थ राहिले.” सावंत यांनी हेही नमूद केलं की, “अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, त्यांनी युद्ध रोखले. पण मोदींनी कधीच सांगितलं नाही की पाकिस्ताननेच युद्ध थांबवण्याची विनंती केली होती. हे देशाला का सांगितलं जात नाही?” या आक्रमक भाषणातून अरविंद सावंत यांनी सरकारच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.