आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) यंदा विशेष तयारी केली होती. राज्यभरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या या भक्तांच्या प्रवासासाठी तब्बल 5 हजार 200 अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. या सेवेमुळे महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून 9 लाख 71 हजार 683 भाविकांनी एसटीने प्रवास केला आहे. या संपूर्ण काळात ST महामंडळाने 21 हजार 499 फेऱ्या केल्या. या सेवांमधून महामंडळाला 35.87 कोटी रुपये इतकं उत्पन्न मिळालं आहे. ही माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक यांच्या माहितीनुसार, 3 ते 10 जुलै दरम्यान राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, संभाजीनगर आदी प्रमुख शहरांसह इतर विभागांमधून विशेष बससेवा राबवण्यात आली. यामुळे ग्रामीण भागातील भाविकांनाही विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचणे सहज शक्य झाले.
महत्त्वाचं म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं उत्पन्न 6.96 कोटींनी जास्त आहे. 2024 मध्ये आषाढी यात्रेमधून मिळालेलं एकूण उत्पन्न 28.91 कोटी रुपये इतकं होतं.
मंत्री सरनाईक म्हणाले की, “ST महामंडळ भाविकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. भाविकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वेळेत होण्यासाठी आम्ही सर्व स्तरांवर प्रयत्नशील होतो. यंदाची सेवा ही त्या प्रयत्नांचं यश आहे.” वारकऱ्यांच्या सेवेतून मिळालेलं हे उत्पन्न एसटी महामंडळासाठी दिलासादायक ठरलं असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या विशेष सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचं संकेत त्यांनी दिले.
हेही वाचा