थोडक्यात
बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच अंबादास दानवेंचं टीकास्त्र
काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी
काँग्रेसला जनतेने नाकारले : चंद्रशेखर बावनकुळे
राज्याचे लक्ष गेल्या काही दिवसांपासून वेधून ठेवलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025 ) अखेर शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार भाजप (BJP) आणि जदयूच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे. भाजपने 243 पैकी 101 जागांवर यंदाच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले असून, भाजप आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी विशेष म्हणजे प्रथमच समान संख्येने जागांवर निवडणूक लढवली आहे. 2020 च्या निवडणुकीत भाजप 74 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा तर जेडीयू 43 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. दोन्ही पक्षांनी मिळून एनडीए सरकारची स्थापना केली होती. तसेच राष्ट्रीय जनता दलने 143 जागा, काँग्रेसने 61 जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने 20 जागा आणि विकसनशील इंसान पार्टीने 12 जागा लढवल्या. सध्याच्या कलांवर नजर टाकल्यास, 193 जागांवर एनडीए आघाडी आघाडीवर असून 45 जागांवर महागठबंधन पुढे आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर घणाघात केलाय.
अंबादास दानवे म्हणाले की, पराभव झालेला मान्य आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला. त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या. मतदार यादीत घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, हे माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, बिहारचे गणित आणि महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे. राज्यात महाविकास आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, जागावाटप अखेरच्या दिवशीपर्यंत होत असेल तर गंभीर आहे. याचे परिणाम निकालावर होतात. महाराष्ट्रात निवडणुकीवेळी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केले असते, जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते. जी चूक महाराष्ट्रामध्ये झाली तीच बिहारमध्ये झाली. काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला जनतेने नाकारले : चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, बिहार निवडणुकीच्या निकालावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील काँग्रेसवर टीका केलीय. काँग्रेस रोजच संपत आहे, राहुल गांधी हतबल झाले आहेत. फक्त मतदार यादीचे चुकीचे मुद्दे समोर करून वेळकाढूपणा करत आहे. विकासाचा कुठलाच अजेंडा त्यांच्याकडे नाही. धर्म, जात पंथाचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे. काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर बसायला कोणी तयार नाही. काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. काँग्रेसला बिहारमधून बाहेर काढले आहे. आगामी काळात काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष होईल, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय.