अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या आशिष शेलार यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून "मराठीचा संस्कार" आपल्या नव्या पिढीवर व्हावा, म्हणून येथे सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे शाळा चालवतात. 2005 पासून ही शाळा चालवली जात असून सुमारे 300 विद्यार्थी येथे मराठीमध्ये शिक्षण घेत आहेत.
अमेरिकेत अशा 50 हून अधिक शाळा या मराठीच्या असून येथील मराठी माणसं या शाळा चालवत आहेत. अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने शिफारस केली तसेच अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला तर मराठी भाषा शिकवणे, परीक्षा व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे सोईचे होईल, असे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीत लक्षात आणून दिले.
दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्र शासनाचे आवश्यक ते सहकार्य व शिफारस, अभ्यासक्रम नक्की देईल, असे आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाला यावेळी दिले.
हेही वाचा