प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी अभिनेते अशोक सराफ यांंना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विनोदाचा बादशाह अशोक सराफ
मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यांचे लाडके अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. अशोक सराफ विनोदाचं अचूक टायमिंग साधणारे कलाकार म्हणून ओळखले जातात. अभिनयाच्या क्षेत्रात नाटक असो चित्रपट किंवा मालिका सहज अभिनय करत उत्तम विनोद करणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ म्हटलं की त्यांचा एव्हरग्रीन कॉमेडी चित्रपट अशीही बनवा बनवी आठवतो. त्यांनी साकारलेल्या धनंजय माने या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विनोदाच्या या बादशहाला पद्मश्री पुरस्कार मिळणं ही संपूर्ण मराठी सृष्टीसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.
'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ
महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यानंतर आता जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार म्हणजे त्यांच्या अभिनयाला दिलेली सर्वोच्च दाद म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मराठी सिनेविश्वात एक काळ लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी गाजवला आहे. अशोक सराफ यांनी एकामागोमाग तुफान कॉमेडी करत पोट धरून हसायला लावणारे अनेक चित्रपट केले.
आयत्या घरात घरोबा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, भुताचा भाऊ, धुमधडाका असे एकापेक्ष एक सरस चित्रपट अशोक सराफ यांनी महाराष्ट्राला दिले. हिंदी सिनेमातील अजय देवगणच्या सिंघममध्ये अशोक सराफ यांनी साकारलेला हवालदारही विशेष लक्षवेधी ठरला. ‘पांडू हवालदार’ आणि ‘राम राम गंगाराम’ या दोन चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांच्यासह त्यांनी भूमिका केल्या. भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.