Attack Attempt on Vinod Kulkarni : सातारा शहरातील शाहू क्रीडांगणात काल 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. मात्र या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. साहित्य संमेलनाचे कार्यकारी प्रमुख विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्यात या साहित्य संमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू होती. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते संमेलनाचे प्रतीक शाहू स्टेडियममध्ये सोडण्यात आले होते. 1 जानेवारीपासून संमेलनाला अधिकृत सुरुवात झाली. अशातच, संमेलनाच्या ठिकाणीच विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हा प्रकार नेमका कोणी केला, याबाबतही कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. या घटनेमुळे साहित्यिक आणि उपस्थित नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
संमेलनात काय खास आहे?
शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या या मराठी साहित्य संमेलनात दीडशेहून अधिक पुस्तकांचे दालन उभारण्यात आले आहेत. पर्यावरण, सामाजिक विषय आणि विविध साहित्यिक मुद्द्यांवर आधारित उपक्रम ठेवण्यात आले आहेत. संपूर्ण क्रीडा संकुल आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागांतून लेखक, कवी आणि वाचक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कार्यक्रमांसाठी दोन मोठे मंडप उभारण्यात आले असून ग्रंथदिंडीत ५२ चित्ररथांचा सहभाग आहे. याशिवाय कवी मंच, गझल मंच, पुस्तक प्रकाशनासाठी स्वतंत्र व्यासपीठ आणि वाचकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
उद्घाटनाला कोण उपस्थित होते?
1 जानेवारी रोजी या साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), शाहूपुरी शाखा आणि मावळ फाउंडेशन, सातारा यांच्या संयुक्त आयोजनातून हे संमेलन भरवण्यात आले आहे. संमेलनाचा ध्वज अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते फडकवण्यात आला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही उपस्थित होते.
थोडक्यात
सातारा शहरातील शाहू क्रीडांगणात काल ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाले
संमेलन सुरू असतानाच एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती
साहित्य संमेलनाचे कार्यकारी प्रमुख विनोद कुलकर्णी यांच्यावर
हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा
कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले