महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्यांच्या हालचालींमुळे भीषण आग लागली. गॅस कटरचा वापर करत असताना अचानक झालेल्या स्फोटामुळे बँकेत आग पसरली आणि काही क्षणांतच संपूर्ण शाखा जळून खाक झाली.
ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात रविवारी पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्यासाठी गॅस कटरचा वापर केला होता. मात्र, याच वेळी गॅसचा जोरदार स्फोट झाला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आग लागली अशी स्थानिकांनी माहिती दिली आग लागल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढला असे स्थानिकांनी सांगितले.
स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जागे झाले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने रात्रभर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि अखेर आग आटोक्यात आनली. या आगीत बँकेतील महत्त्वाचे कागदपत्रे, फर्निचर, संगणक यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांकडून वापरल्या गेलेल्या गॅस कटरमुळेच स्फोट झाला आणि ही भीषण आग लागली.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अचानक आग लागली असता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही आग एवढी भीषण होती की काही मिनिटातच या ठिकाणी संपूर्ण जळून खाक झाले.आगीत मोठ्या प्रमाणात बँकेचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.