देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू कुटुंबांना गंभीर आजारांवर उपचार करणे परवडत नसल्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत अशा कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील, अशी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी ‘आयुष्मान भारत’ कार्ड (Ayushman Card) तयार करणे आवश्यक आहे.
आरोग्य सेवा महाग होत असतानाच आयुष्मान भारत योजना गरजूंसाठी एक आश्वासक सुविधा ठरत आहे. या योजनेत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्चही समाविष्ट आहे. यामध्ये निदान, औषधे, शस्त्रक्रिया, उपचारांनंतरचा निवास आणि निगा यांचाही समावेश आहे.
या योजनेत अशा लाभार्थ्यांचा समावेश आहे जे कोणत्याही इतर आरोग्य योजनेखाली येत नाहीत. वयाच्या ७० वर्षांवरील नागरिक, उत्पन्नाची मर्यादा न पाहता, या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, करदाते, आर्थिकदृष्ट्या सशक्त नागरिक आणि जे PF किंवा ESIC सारख्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
आपण या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे तपासण्यासाठी beneficiary.nha.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन, ‘मी पात्र आहे का?’ या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर व OTP द्वारे तपासणी करता येते. या योजनेअंतर्गत अनेक गंभीर व जटिल आजारांचा समावेश असून, त्यात प्रमुखतः हृदयरोग, कर्करोग, न्यूरोलॉजिकल विकार, किडनी व लिव्हरचे आजार, फुफ्फुसांचे आजार, हाडांचे विकार, प्रसूती व स्त्रीरोग शस्त्रक्रिया, मानसिक आजार, नवजात शिशूंची निगा, जळालेल्या जखमा आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण यांचा समावेश आहे.
हृदयरोगात कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी यांचा समावेश असून, कर्करोगाच्या बाबतीत स्तन, गर्भाशय ग्रीवा, तोंड, पचनसंस्था आणि फुफ्फुसाच्या कर्करोगावर केमोथेरपी व रेडिएशन थेरपीचा लाभ दिला जातो.
ब्रेन ट्युमर, स्ट्रोक, अर्धांगवायू, एपिलेप्सी आणि पार्किन्सन यांसारख्या न्यूरोलॉजिकल विकारांवरही उपचार मोफत केले जातात. याशिवाय, किडनी प्रत्यारोपण, डायलिसिस, यकृत सिरोसिस, हेपेटायटीस बी-सी, अॅपेंडिसाइटिस, हर्निया, दमा, टीबी, COPD, ILD यासारख्या अनेक आजारांवरही उपचाराचा खर्च सरकार उठवते.
हिप व गुडघा प्रत्यारोपण, हाडांचे फ्रॅक्चर, संधिवात यांचाही समावेश आहे. प्रसूती संदर्भातील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया आणि नवजात बालकांच्या आरोग्यसेवांचीही संपूर्ण काळजी घेतली जाते. या योजनेचा उद्देश गरीब आणि वंचित घटकांना आर्थिक ओझ्याशिवाय चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. आतापर्यंत लाखो लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, आणखी अनेक कुटुंबांसाठी हे आरोग्य सुरक्षाकवच ठरत आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल, तर आजच आयुष्मान कार्ड तयार करा आणि या योजनेचा लाभ घ्या.