बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये पुन्हा वाद पेटला आहे. बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून राजकीय पुर्नवसनाची मागणी केली असल्याचा दावा रवी राणा यांनी केला होता. त्यावरुन आता बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिल आहे. मेलो तरी चालेल पण कुणाच्या पाठिंब्यावर आमदार होणार नाही, अशा शब्दात बच्चू कडूंनी आमदार रवी राणा यांच्या टिकेला सडेतोड प्रतिउत्तर दिलं आहे.
रवी राणा म्हणाले होती की, "बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांना बच्चू कडू यांनी म्हटलं की माझं राजकीय पुनर्वसन करा मला विधान परिषद द्या. बच्चू कडू हे नेहमीप्रमाणे सरकारला ब्लॅकमेल करत आहे. बच्चू कडू चार वेळा आमदार असताना त्यांनी का वक्तव्य केलं नाही? गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना त्यांनी विचारलं का नाही? बच्चू कडू सत्तेमध्ये होते तेव्हा त्यांनी कापण्याची भाषा केली नाही... एका शेतकऱ्याच्या मुलाने बच्चू कडू यांचा पराभव केला" आमदार रवी राणा यांचा मोठा दावा
बच्चू कडू प्रत्युत्तर देत म्हणाले की, "पहिले तुम्ही सांगा नवरा -बायको वेगवेगळ्या पक्षात का राहता? बायको भाजपामध्ये आणि तुम्ही स्वाभिमान पक्षामध्ये... नौटंकी नाही वाटत का? थोडी लाज वाटते का?" असं म्हणत बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीका केली. तसेच पुढे ते म्हणाले की, "अर्जंट देवा भाऊचा कार्यक्रम आला असेल, लगेच स्क्रिप्ट आली असेल, आता वाचून दाखवा मीडियासमोर हे राणा दांपत्याच काम आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना शेतकरी मजुरांशी काही लेणं नाही. माझ्या आमदारकीचा काय विचार करता तुम्ही किती लाचार आहे बघा... मेलो तरी चालेल पण बच्चू कडू कोणाच्या पाठिंब्यावर आमदार होणार नाही", असं म्हणत बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर जहरी टीका केली आहे.