महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोड घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. निमित्त होतं उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं. मात्र, या भेटीमुळे पुन्हा एकदा राज्यात राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. राज ठाकरे तब्बल सहा वर्षांनंतर मातोश्रीवर गेले. 2018 साली त्यांनी आपला मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नासाठी निमंत्रणपत्रिका देण्यासाठी मातोश्रीला भेट दिली होती.
त्यानंतर काल पुन्हा एकदा त्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली आणि उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या काही तासांतच सोशल मीडियावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक भावनिक आणि सूचक पोस्ट केली, जी युतीच्या चर्चांना अधिक गती देणारी ठरली. नांदगावकर यांनी लिहिलं, “दोन पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1+1=2 अशी होते. पण जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतात, तेव्हा हीच ताकद 1+1=11 होते.” त्यांनी ही पोस्ट केवळ राजकीय गणितासाठी नव्हे, तर दोन भावांमधील बंध आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना वाहिलेलं स्मरण म्हणून सादर केलं.
“आज उद्धवसाहेबांना सर्वात मोठं आपुलकीचं गिफ्ट राजसाहेबांनी दिलं. बाळासाहेबांनी हा सुवर्णक्षण पाहायला हवे होता. मातोश्री बंगला आज दोन्ही बंधूंना एकत्र पाहून निश्चितच आनंदी झाला असेल,” असं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, पाच जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या ‘मुंबई विजयी मेळाव्या’मध्येही दोघे ठाकरे एकत्र आले होते. त्या कार्यक्रमानंतरच शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येण्याच्या शक्यता चर्चेत आल्या होत्या. दोन्ही पक्षांनी त्रैभाषिक अध्यादेश रद्द करण्यात यश मिळवले आणि त्यातून राजकीय समन्वयाची नांदीही झाल्याचे बोलले गेले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची भेट ही निव्वळ औपचारिक राहिलेली नाही, असेच संकेत या घटनाक्रमातून मिळत आहेत.
त्यांच्या भेटीतील फोटो, बाळा नांदगावकरांचं सूचक विधान आणि पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चा पाहता, येणाऱ्या काळात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेमध्ये प्रत्यक्ष युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप-शिंदे गटासमोर सध्या महत्त्वाचं आव्हान उभं करणाऱ्या ठाकरे गटासाठी, मनसेसोबतची युती ही निवडणूकपूर्व रणनितीचा भाग असू शकते. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या शहरी भागात मनसेचा प्रभाव लक्षात घेता, ही युती दोन्ही पक्षांसाठी राजकीय फायद्याची ठरू शकते. राजकारणात आकस्मित काहीच नसतं, असं म्हटलं जातं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट, बाळासाहेबांच्या वास्तूवर पुन्हा एकत्र उभं राहणं, आणि ‘1+1=11’ हे विधान. हे सर्व केवळ योगायोग मानावं की रणनीतीचा भाग? हे पुढील काही आठवड्यांत स्पष्ट होईल. मात्र, एक गोष्ट निश्चित दोन ठाकरे एकत्र आल्यावर महाराष्ट्रात राजकारणाची दिशा निश्चितच बदलू शकते.