सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीकडून १५०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचे समोर आले आहे. यावरच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे की, गुन्हेगाराला दहशत बसली पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात ?
संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोण दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये वाल्मिक कराड दोषी असेल मास्टर माईंड असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. बीड घटनेप्रकरणात जे जे सहभागी असतील त्यांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे की, गुन्हेगाराला दहशत बसली पाहिजे.
धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाले?
धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र योग्य निर्णय त्यांनी घेणं आवश्यक आहे. काँग्रेसच्या काळात आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. हा विषय नितीमत्तेचा असतो आणि ती पाळली पाहिजे.
महायुती सरकारमध्ये बिलकुल अलबेल नाही. निवडणुकीच्या पुर्वी सुद्धा प्रंचड गोंधळ झालेला आहे. अनेक चुकीची कामं केली गेली आहेत. अनेक कामांचे इस्टीमेंट वाढवण्यात आले. ही वस्तुस्थिती आहे. पैसा उभा करण्यासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्या गोष्टी बाहेर येत आहेत. आताही सरकारमध्ये गोंधळाची अवस्था आहे. पालकमंत्री सुद्धा नेमू शकत नाहीत.