गणेशोत्सव म्हटलं की, डोळ्यासमोर उभं राहतं बाप्पाचं साजिरं रूप, आरत्या, ढोलताशांचा गजर, उकडीचे मोदक, मखराची सजावट, मित्र-नातेवाईकांची भेटीगाठी. पण या सगळ्यासोबत प्रत्येकाच्या कानावर हमखास पडणारं एक गाणं म्हणजे ‘बाप्पा मोरया रे...’. गणेशोत्सव या गाण्याशिवाय जणू अपूर्णच असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे.
अनेक दशकं रसिकांच्या मनात घर करून राहिलेलं हे गीत लोककवी स्व. हरेंद्र जाधव यांनी लिहिलं असून, त्याला संगीताची साथ दिली आहे मधुकर पाठक यांनी. या गाण्याला प्रसिद्ध लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजानं वेगळं स्थान मिळालं. गाणं उत्सवात आनंद वाढवत असलं तरी त्यामागे एक हळवी कहाणी दडलेली आहे. साहित्य अभ्यासक सोमनाथ कदम यांच्या माहितीनुसार, या गाण्यात 1972 साली महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाचं वर्णन आहे. सलग तीन वर्षांच्या दुष्काळामुळे गावोगाव अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. लोकांना खायला भात नव्हता. त्यावेळी केंद्र सरकारनं अमेरिकेतून लाल गहू आयात केले होते. तांदळाऐवजी अनेक कुटुंबांना लाल गव्हावरच उदरनिर्वाह करावा लागला.
याच परिस्थितीचं दर्शन घडवत गाण्यातील ओळींमध्ये म्हटलंय – “नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे... हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे?” या ओळींतून लोकांच्या व्यथा, महागाईची झळ, आणि बाप्पाकडे सुखद दिवसांची प्रार्थना मांडलेली आहे. त्या काळी गणेशोत्सवात उकडीचे मोदक बनवणंही कठीण झालं होतं. तांदळाऐवजी लाल गव्हाच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा लागत होता. तरीही भक्तिभाव कायम ठेवून लोकांनी या संकटाच्या दिवसांतही गणरायाची सेवा केली.
आज अनेक दशकं उलटून गेली असली तरी ‘बाप्पा मोरया रे’ हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला भावणारं हे गीत गणेशोत्सवाच्या आनंदात भावनिक छटा मिसळतं. म्हणूनच प्रत्येक वर्षी ढोलताशांच्या निनादात, आरत्यांच्या गजरात हे गीत घरोघरी निनादताना ऐकू येतं.