थोडक्यात
उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यातील एका घटनेने आज राजकीय वातावरण गरमावले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठावर रेड कार्पेट आणि व्हीआयपी खुर्ची ठेवण्यात आली होती.
मात्र ही बाब लोकशाही मराठीने प्रसारित केल्यानंतर आयोजकांनी तत्काळ व्हीआयपी खुर्ची हटवली.
उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यातील एका घटनेने आज राजकीय वातावरण गरमावले. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी व्यासपीठावर रेड कार्पेट आणि व्हीआयपी खुर्ची ठेवण्यात आली होती. मात्र ही बाब लोकशाही मराठीने प्रसारित केल्यानंतर आयोजकांनी तत्काळ व्हीआयपी खुर्ची हटवली. या प्रकाराची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा होत असून सत्ताधारी पक्षाकडून टीकेचे सूर अधिक तीव्र झाले आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक दौरा हा रेड कार्पेटवरच असतो. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या समस्या समजत नाहीत. शेतकऱ्यांच्या वेदना काय असतात, त्यांचे प्रश्न किती गंभीर असतात, याची त्यांना कल्पना नाही. “त्यांच्या दौऱ्याचा प्लान म्हणजे रेड कार्पेट टाकणे आणि मोठी व्हीआयपी खुर्ची ठेवणे एवढाच असतो,” अशी टीका बावनकुळे यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना कदाचित नंतर कळाले असेल की ते कोणत्याही पक्षाच्या मोठ्या मेळाव्याला किंवा खास कार्यक्रमाला नाही तर शेतकऱ्यांच्या भेटीगाठींसाठी येत आहेत. अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारची आढ्यता किंवा अतिशोक्ती दाखवू नये, असे निर्देश आम्ही नेहमी देत असतो. मात्र ठाकरे यांचा स्वभावच मोठी खुर्ची आणि रेड कार्पेट हा असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, शेतकरी व जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मात्र स्वागताच्या पद्धतीवरून उडालेले राजकीय वादळ लक्षवेधी ठरत आहे.