इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला दुखापतीचे मोठे संकट सहन करावे लागले. विशेषतः चौथ्या कसोटी सामन्यात स्टार विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर संघाचे गणित पूर्णपणे बिघडले. पंतच्या दुखापतीमुळे भारताच्या बॅटिंग आणि विकेटकीपिंगची मोठी ताकद कमी झाली होती. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, देशांतर्गत क्रिकेटसाठी नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने 2025-26 हंगामापासून देशांतर्गत मल्टी-डे क्रिकेट सामन्यांमध्ये ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ हा नवा नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार, एखादा खेळाडू सामन्यादरम्यान गंभीर जखमी होऊन सामन्यातून बाहेर पडला, तर तत्काळ त्याची जागा समान कौशल्य असलेल्या खेळाडूला देता येईल.
कसा लागू होईल हा नियम?
या नव्या नियमानुसार फलंदाजाच्या जागी फलंदाज, गोलंदाजाच्या जागी गोलंदाज आणि अष्टपैलूच्या जागी अष्टपैलू खेळाडू निवडला जाईल. नाणेफेकीपूर्वी घोषित केलेल्या पर्यायी खेळाडूंच्या यादीतून ही रिप्लेसमेंट केली जाईल. मात्र जर दुखापत झालेला खेळाडू विकेटकीपर असेल आणि संघात दुसरा कीपर नसेल, तर सामनाधिकारी विशेष परवानगी देऊन बाहेरील विकेटकीपरलादेखील बोलावण्याची मुभा देतील. हा नियम रणनिती बिघडू नये आणि खेळाचा दर्जा कायम रहावा यासाठी तयार करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या पंचांच्या सेमिनारमध्ये या नव्या नियमाची सविस्तर माहिती पंचांना देण्यात आली असून, आगामी हंगामापासून तो अमलात येणार आहे.
मर्यादा कुठे?
विशेष म्हणजे, हा नियम फक्त मल्टी-डे स्वरूपातील सामन्यांसाठीच लागू होईल. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (सय्यद मुश्ताक अली टी20 आणि विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा) या नियमानुसार बदली खेळाडूला परवानगी मिळणार नाही. याशिवाय आयपीएलमध्ये हा नियम लागू होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
आयसीसीच्या नियमांपेक्षा वेगळा
आयसीसीच्या नियमानुसार फक्त कन्कशन सब्स्टीट्यूट (डोक्याला दुखापत झाल्यास) देण्याची परवानगी असते आणि त्या खेळाडूला सात दिवस विश्रांती बंधनकारक असते. पण बीसीसीआयचा ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ नियम अधिक व्यापक आहे. यामुळे संघांना गंभीर दुखापतीच्या प्रसंगी लगेचच पर्यायी खेळाडू उपलब्ध करून देऊन खेळाचा समतोल राखता येईल. ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर बीसीसीआयचे डोळे उघडले असल्याचे मानले जात आहे आणि याच अनुभवातून देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा नवा नियम आणला जात आहे.