मुंबई वरळी मधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बहुचर्चित बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात आले असुन लवकरच त्या चाळीतील रहिवाश्यांना नवीन घराच्या चाव्या मिळणार आहेत. त्यामुळे वरळी नायगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासुन बीडीडी चाळीचा पुनर्विकासाचे काम चालू होते. त्या चाळींचा पुनर्विकास करून आता तिथे मोठं मोठे टॉवर उभारण्यात आले आहेत. या टॉवर मध्ये पाणी गॅस आणि पार्किंगच्या योग्य सुविधा देण्यात आल्या असून या मूलभूत सोयीसुविधा नागरिकांना व्यवस्थित पुरवल्या जातील असे आश्वासन म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरकर यांनी यावेळी दिले.
तसे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनाया आता दिलासादायक बातमी मिळाली असून येत्या श्रावणमध्ये या चाळीतील लोकांना आपले हक्काचे घर मिळणार आहे. अशी माहिती मुंबई उपनगर चे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली. यावेळी सुमारे दोन ते तीन तास आशिष शेलार यांनी लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांना योग्य आणि चांगल्या सुविधा पुरविण्याबाबत आश्वासन दिले.
वरळी बीडीडी मधील ५५६ घरांचा ताबा हा पुढील दोन आठवड्यांमध्ये देण्यात येणार आहे. त्या नंतर १४१९ घरांचा ताबा हा येत्या सप्टेंबर महिन्यात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. बीडीडी चाळीचा पुनर्विकास हे मुंबई मधील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असून वरळीकरांना आणि नायगावकरांना मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर स्वतःच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.