Navnath Waghmare : ओबीसी आरक्षण आणि हक्कांच्या मागणीसाठी आष्टीत काढलेल्या मोर्चात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी धस यांना थेट इशारा देत “आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारस आहोत, मग निझामाचे हैदराबाद गॅझेट कशाला लागू करता? यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
वाघमारे यांनी आष्टी तालुक्यातील राजकीय घडामोडींचा उल्लेख करताना म्हटलं की, “आष्टीचा जब्या पुन्हा मुंडेंकडे येणार आहे. आगामी निवडणुकीत याचा कार्यक्रम करू.” त्यांनी सुरेश धसांवर वैयक्तिक टीका करताना ग्रामपंचायतीपासून आमदारकीपर्यंतच्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. “आमचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा झाला तरी यांना चालत नाही, मग आम्हालाही हे आमदार झालेलं चालणार नाही,” अशी जोरदार फटकार त्यांनी लगावली.
ओबीसी समाजाच्या राजकीय एकजुटीवर भर देताना वाघमारे म्हणाले की, ओबीसींनी यापुढे फक्त ओबीसी समाजातील उमेदवारांनाच मतदान करावे. “आम्ही समाजाच्या ताकदीवर उभे आहोत. ज्यांना आमचं अस्तित्व नकोय, त्यांना आम्हीही यापुढे राजकारणात स्थान देणार नाही,” असे ते म्हणाले.
या वक्तव्यामुळे आष्टीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघमारेंच्या या टीकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंडे-धस यांच्यातील स्थानिक राजकारणाचा व ओबीसी मतदारांच्या एकजुटीचा थेट परिणाम निवडणूक समीकरणांवर होण्याची शक्यता आहे.